राजधानीत शिवजयंती जल्लोषात साजरी

राजधानीत महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सव' साजरा



महाराष्ट्र वाल्मिकी ग.दि.माडगूळकर आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या गीत रामयणाचे, गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी केलेल्या सुमधूर सादरीकरणाने येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटर मध्ये महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सव सम्पन्न झाला.



महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यावतीने अलिकडेच 'महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय, ज्येष्ठ नेते शाम जाजू, गायक श्रीधर फडके, विरेंद्र उपाध्याय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन केले.


या महोत्सवात पहिल्याच दिवशी आज रंगनिषाद प्रस्तुत आणि सुधीर फडके यांचे पूत्र प्रसिध्द गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी 'गीत रामायण' हा सुरेल रामकथेचा कार्यक्रम सादर केला. ह्य स्वयें श्री राम प्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती गीत रामायणातील पहिल्या गीतालाच उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. गीत रामायणाच्या प्रत्येक गितातील शब्द, स्वर आणि उच्चारांची सौंदर्य स्थळे श्रीधर फडके यांनी आपल्या गायनातून सादर केली. गीत रामायणाच्या निर्मितीस पूर्ण झालेली ६४ वर्षे आणि रसिकांचा मिळालेला प्रतिसाद यावरही श्रीधर फडके यांनी विविध किस्स्यांतून प्रकाश टाकला.